राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे भाष्य केलं आहे. त्या लातूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, तर महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील आहेत. आमच्या पक्षातील एक घटक सरकारमध्ये सामील झाला आहे. ते आमच्या विचारधारेच्या पलीकडं असल्यानं आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय.”
हेही वाचा : “आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल, परत…”, भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट इशारा
“निवडणूक आयोगानं विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही दिली आहेत. पण, चिन्ह मिळण्याबाबत प्रफुल्ल पटेल सतत तारीख देतात. प्रफुल्ल पटेलांना तारीखा सांगणार अदृष्य हात कुणाचा आहे? याचं उत्तर माझ्याकडं नाही. प्रशासन आणि निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल,” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला मिळालेल्या नोटीसीबाबत प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “रोहित पवार विरोधात आहेत. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी विरोधातील लोकांना त्रास देतात. नंतर भाजपाच्या वॉशिंग मशीनमधून बाहेर पडल्यानंतर स्वच्छ होतात. त्यामुळे आम्हाला याची सवय झाली आहे. पण, सत्यमेव जयते, आम्ही सत्य बोलणारे आहोत. देशात कुणीतरी सत्य बोललं पाहिजे.”