शुक्रवारी सकाळी ( १० नोव्हेंबर ) मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तर, राष्ट्रवादीकडून फूटीर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कुणाची? याची सुनावणी सुरू आहे. अशातच शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पवार कुटुंबीय एकत्र आले होते.
यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्या प्रकृतीबाबतही सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
हेही वाचा : दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवारांची भेट, जयंत पाटील म्हणाले…
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवारांची प्रकृती १०० टक्के ठिक नाही. त्यामुळे अजित पवारांना काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दिल्ली, मुंबई, आणि पुण्यात हवामान अतिशय वाईट आहे.”
हेही वाचा : संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द शरद पवार की अजित पवारांचा? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…
“हा फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. एन. डी पाटील यांच्या पत्नी सरोजनी पाटील या शरद पवार यांच्या बहीण आहेत. एन. डी पाटील आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला आहे. पण, व्यक्तिगत नात्यात कधीही दुरावा आला नाही. आमची व्यक्तिगत लढाई कुणाशीही नाही,” असं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या भेटीवर स्पष्ट केलं.