Supriya Sule on Sunil Tingre Notice : पुण्यातील पोर्शे प्रकरण राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने लावून धरलं होतं. या हिट अॅन्ड रन प्रकरणात दोन तरुणांचा जागीच जीव गेला होता. अल्पवयीन असलेल्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघांना ठार केलं होतं. याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव आलं होतं. आता निवडणुकीच्या तोंडावर आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना माफी मागण्यासाठी नोटीस पाठवली होती, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलेला. परंतु, त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सुनील टिंगरे आणि अजित पवार यांनी म्हटल्यावर सुप्रिया सुळे यांनी ती नोटीसच माध्यमांसमोर दाखवली.
शरद पवार यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी नोटीस बजावली असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केला होता. परंतु, हा दावा सुनील टिंगरे यांनी फेटाळून लावला. अशी नोटीस पाठवली असेल तर ती जाहीर करावी, असं आव्हानही सुप्रिया सुळेंना देण्यात आलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी ती नोटीसच माध्यमांना आज वाचून दाखवली. या नोटीसीनुसार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही नोटीस पाठवली नसून शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसलाही पाठवण्यात आली होती. यामध्ये पक्षाच्या अध्यक्षांनी माफी मागावी असं नमूद असल्याचं सुप्रिया सुळेंनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं.
हेही वाचा >> Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
नोटीशीतून गुन्हा दाखल करण्याचा इशारा
पोर्शप्रकरणात पवारांंनी आणि आम्ही माफी मागावी असं नोटिशीत म्हटलं आहे. पोर्श कारचा अपघात झाला. पोलिसांनी मान्य केलं होतं की सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते. आणि या प्रकरणावरून आम्ही आता माफी मागावी? जर आम्ही त्यांच्यावर टीका केली तर ते आमच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल कारवाई करू असा इशाराही त्यांनी या नोटीशीतून दिला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.