Supriya Sule on Vinod Tawade Allegations : विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“यांच्याकडे पैसे येतात कुठून? नोटबंदी भाजपाच्या सरकारने केली. मग एवढ्या नोटा येतात कुठून? एकीकडे नोटबंदी करता मग चलनात एवढी रोख रक्कम येते कुठून? विनोद तावडेंवर हा आरोप होतोय ही अतिशय धक्कादायक बाब आहे. भाजपाच्या ओरिजिनिल लोकांकडून अशी कृती कधीच होणार नाही. ही अस्वस्थ करणारी कृती आहे”, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : ‘सोडून दिलं…”, विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर हितेंद्र ठाकूर बॅकफूटवर?

विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे मला माहीत नाही. पण माझा प्रश्न आहे की देशाच्या पतंप्रधांनांनी देशातील काळे पैसे जावेत म्हणून नोटबंदी केली. पण भाजपाकडे ५ कोटीपर्यंतची रोख रक्कम आली कोठून? या पैशांची मुव्हमेट कशी केली? भारतातील नागरीक न्याय मागत आहेत. हे चुकीचं आहे. घाणेरड्या आणि गलिच्छ कृतीचा जाहीर निषेध करते. भाजपा घाबरत आहे. सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय. पण अशी अपेक्षा भाजपाकडून नव्हती. विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. त्यांच्याबाबत अशी बातमी येणं, दु:ख देणारं. विनोदजी मला धक्का बसलाय की भाजपा असं काही करू शकेल”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

श्रीनिवास पवार यांच्या शोरुममध्ये सर्च ऑपरेशन

मी संविधानाच्या चौकटीत वागणारी, भारताची नागरिक आहे. लोकप्रतिनिधी आहे. काल रात्री श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया अधिकारी आले होते. माझ्या हातात जेवण होतं, मी म्हटलं की मी लगेच येते. रेवती आणि मी पटकन हात धुतला, ताटावरून उठलो. वडीलही म्हणाले की मी येतो. त्यांनी आमच्या गाड्या तपासल्या, ऑफिस तपासलं. पण त्यांना काहीच सापडलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.