अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शरद पवार गटाच्या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. वडील शरद पवार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी १५ वर्षांपूर्वी दासू वैद्य यांनी त्यांच्यासाठी लिहिलेली कविता वाचली आहे.
सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या, “१५ वर्षांपूर्वी दासू वैद्य यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती. तेव्हा मी स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते. त्यांनी लिहिलं होतं की, ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’. हा बाप (शरद पवार) माझा एकटीचा बाप नाही. माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. एक सांगते बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला. आमच्यावर काहीही बोला. पण बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ पण बापाबद्दल काहीही ऐकून घेणार नाही.”
हेही वाचा- “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची…”, रोहित पवारांचं विधान
“मी एक महिला आहे. कुणी काही बोललं तर लगेच डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा संघर्षाची वेळ येते. तेव्हा तिच पदर खोचून आहिल्या होते, ताराराणी होती, जिजाऊ होते. आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तिच्या विरोधात नाही, आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या प्रवृत्तीविरोधात लढायचं आहे,” असा निर्धारही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.
हेही वाचा- “…तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे”, रुपाली चाकणकरांचा शरद पवार गटातील नेत्यांना इशारा
“नॅशन्लिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपीला ते (भाजपा) ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असं म्हणायचे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा द्यायचे. पण त्यांना जेव्हा गरज भासेल, तेव्हा हीच ‘नॅचरली करप्ट पार्टी पूरा खाऊंगा’ अशी भाजपा आहे. त्यामुळे भाजपावर माझा आरोप आहे की, भाजपा हीच देशातील सगळ्यात भ्रष्टाचारी पार्टी आहे”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.