Supriya Sule on Amit Shah : शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
“१९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली”, असं अमित शाह म्हणाले होते. अमित शाहांनी अशाप्रकारे घणाघाती टीका केल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाहांनी परभणी आणि बीड प्रकरणावर बोलायला हवं होतं
अमित शाहांच्या या टीकेवर सुप्रिया सुळेंनी पलटवार केला आहे. “एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता.”
“बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवलं आहे गेल्या काही दिवसांपासून. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण ३१ दिवस लावून धरलं आहे. कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं. आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवालही यावेळी सुप्रिया सुळेंनी केला.
© IE Online Media Services (P) Ltd