काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पक्षात फूट पडली असून दोन्ही गटाचे नेते आमने-सामने आले आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा नेहमीच बॉस राहिला पाहिजे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत असले तरी राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे. स्वत:साठी दहा आणि पक्षासाठी १४ तास द्या. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचं समर्थन करत अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
हेही वाचा- “…हे मृत्यू योगायोग नक्कीच नाहीत”, नांदेडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला काही आश्चर्य वाटत नाही. भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र पक्षांना कसं वागवते? हे मी नऊ वर्षे दिल्लीत फार जवळून पाहिलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस वेगळं काही बोलले नाहीत. ते खरंच बोलले आहेत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी वागते, त्यात मला काहीही आश्चर्य वाटलं नाही. हे ज्यांना माहीत नसेल त्यांना मी तरी काय म्हणू…, असा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावला.
हेही वाचा- “महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात घडलेल्या मृत्यूकांडावरून सरकारवर टीकास्र सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. सध्याच्या सरकारचा कारभार आपण सर्वजण पाहत आहोत. ज्या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी रोष आहे, असेही त्या म्हणाल्या.