भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटी विभागाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सुमारे १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अपनों पे सितम, गैरों पे करम’ या गाण्याची आठवण करून देत त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

सुप्रिया सुळे ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “जुन्या हिंदी चित्रपटातील ‘अपनों पे सितम, गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी, अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतोय, याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजा मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे दिले पाहिजे.”

हेही वाचा- “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

“इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आलं. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली.

हेही वाचा- बारामतीतून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…

सुप्रिया सुळे पोस्टमध्ये पुढे म्हणाल्या, “नमूद करण्याची बाब म्हणजे शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे.”

Story img Loader