Supriya Sule Reaction on Jay Pawar Engagement Ceremony : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा धाकटा पुत्र जय पवार यांचा काल (१० एप्रिल) पुण्यातील फार्महाऊसवर ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा झाला. या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबिय एकत्र आले होते. सुप्रिया सुळेंसह शरद पवारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. राजकीय मतभेद बाजूला सारून संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसत होता. दरम्यान, या कालच्या रम्य संध्याकाळबाबत सुप्रिया सुळे यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या.

जय पवार यांच्या साखरपुड्याला सहकुटुंब हजर राहिल्याबद्दल सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कुटुंबातील गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि कुटुंबात गल्लत कोणीच करू नये. जय आणि ऋतूचा काल साखरपुडा सोहळा पार पडला. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात एक लेक येतेय.”

त्या पुढे म्हणाल्या, “कालच्या सोहळ्यात सर्वांत ज्येष्ठ आशा काकी, सुमती काकू खास हंपीवरून आल्या होत्या. सर्वच होते. मध्यंतरी आमच्या घरात एक दुर्दैवी घटना झाली की आमच्या भारती काकी गेल्या. त्या गेल्यानंतर त्यातून आमचं कुटुंब सावरत होतं. त्याच काळात हा साखरपुडा झाला. त्यामुळे या अडचणीच्या काळातून, दुःखाच्या काळातून जात असताना एक आनंदाची संध्याकाळ आमच्या कुटुंबाला मिळाली.”

शरद पवारांची एन्ट्री अन्…

दरम्यान, काल सायंकाळी जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटोआणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यानुसार शरद पवारांनी आपल्या नातवाच्या साखरपुड्याला हजेरी लावलेली दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना आणायला खुद्द अजित पवार गेटपर्यंत गेले होते. अजित पवार, पार्थ पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनीही या शाही सोहळ्यातील कौटुंबिक फोटो शेअर केले असून यामध्ये पवार कुटुंबातील अनेक मंडळी एकत्र दिसत आहेत. पार्थ पवार, जय पवार, होणाऱ्या सूनबाई ऋतुजा पाटील आणि सुप्रिया सुळे असा एकत्र कौटुंबिक फोटोही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने राजकीय मतभेद दूर सारून पवार कुटुंब एकत्र आल्याचे म्हटलं जातंय.