Supriya Sule : राखी पौर्णिमा हा सण जवळ आला आहे. येत्या १९ तारखेला राखी पौर्णिमा आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा पवित्र सण. या सणाच्या दिवशी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. कारण जुलै २०२३ पासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. खरंतर २०२३ मध्ये झालेल्या पवार कुटुंबाच्या दिवाळीत अजित पवार सहभागी झाले होते. आता रक्षाबंधन या दिवशी काय होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांना चूक मान्य

अजित पवार यांनी नुकतीच सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत चूकही मान्य केली. “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या ( Supriya Sule ) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना ( Supriya Sule ) अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Supriya Sule : “मी माझ्या बहिणींना विनंती करते…”, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर सुप्रिया सुळेंचं महिलांना आवाहन!

लोकसभा निवडणुकीच्या आधी नेमकं काय घडलं?

जुलै २०२३ या महिन्यात अजित पवारांनी थेट त्यांचे काका आणि राजकीय गुरु शरद पवार यांनाच आव्हान दिलं. तुमचं आता वय झालं आहे, तुम्ही आम्हाला सल्ला द्या, मार्गदर्शन करा आमचं काही चुकलं तर सांगा पण आता आराम करा. असं म्हणत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी असंच त्यांनी सुचवलं होतं. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार ( Ajit Pawar ) महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ५ जुलै रोजी केलेल्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर खूप टीका केली. तसंच त्यांच्या भूमिका बदलण्याचा आपल्याला कसा वारंवार त्रास झाला हे देखील सांगितलं. ज्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. शरद पवारांबरोबर काही मोजके लोक राहिले आणि अजित पवारांसह ४१ आमदार आले. अशात लोकसभा निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची ( Supriya Sule ) जागा तर निवडून आणलीच शिवाय आठ खासदारही निवडून आणले.

सुप्रिया सुळे अजित पवारांबाबत काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असं एका शब्दात उत्तर दिलं. तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule reaction on question about ajit pawar rakhi on rakasha bandhan what did she say scj
Show comments