Supriya Sule Speaks on Walmik Karad: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून गेल्या २२ दिवसांपासून ज्या व्यक्तीचं नाव सर्व माध्यमांमध्ये, राजकीय वर्तुळात सातत्याने घेतलं जात होतं, खुद्द देशमुख कुटुंबीयांनीही ज्यांचं नाव घेतलं तो वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आमदार सुरेश धस यांनी बँक खाती गोठवल्यानंतर वाल्मिक कराड शरण आल्याचा दावा केला असताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीवर परखड शब्दांत भाष्य केलं आहे.
“अटक झाली असती तर समाधान वाटलं असतं”
“परभणी आणि बीड या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत. या कुटुंबांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सरकारचीही आहे आणि आम्हीही ती घेतली आहे. मला शरण वगैरे शब्द योग्य वाटत नाही. अटक झाली असती तर मनाला थोडंसं समाधान वाटलं असतं. माझी अपेक्षा होती की सरकारनं त्यांना अटक करायला हवी होती. शरण काय म्हणताय? एका माणसाची हत्या झाली आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू आयुष्यात कुणीच विसरणार नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली.
“पोलीस यंत्रणा त्यांना शोधतच होती. एक माणूस व्हिडीओ व्हायरल करतो. पण तो आपल्याला सापडत नाही. हे फार धक्कादायक आणि वेदना देणारं आहे. माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची हिंमत कशी होऊ शकते? ज्याच्याबद्दल गेल्या अनेक आठवड्यांपासून सगळीकडे एवढा रोष आहे, तो एक व्हिडीओ काढतो. तो पोस्ट करतो आणि तरी त्याला अटक होत नाही. यावर गृहमंत्रालयाचं काय निवेदन येतं याची वाट बघूयात. पोलिसांना कसं कळलं नाही की हे कुठे होते?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
“पोलिसांच्या मागे कोण आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे”
दरम्यान, या प्रकरणावरून पोलिसांना दोष देण्यास सुप्रिया सुळेंनी नकार दिला. “बीडच्या एसपींची बदली झाली तेव्हाही मी त्यांना यासाठी दोष दिला नाही. कारण कदाचित त्यांची चूक नसावी. त्यांना कुणी फोन केला हा प्रश्न आहे. फक्त पोलिसांची बदली करून हा प्रश्न सुटत नाही. त्याच्यामागे कोण आहे? हे षडयंत्र कुणाचं आहे? ती कोणती मोठी ताकद संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? या मुळाशी आपण गेलं पाहिजे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते बीडचे पालकमंत्री झाले किंवा नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला एवढं मोठं बहुमत दिलं आहे. एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महिला म्हणून मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते. आमच्या या लेकी-सुनांना न्याय द्या. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू मला प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत. ती बिचारी तिच्या वडिलांसाठी लढते आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. आपण सगळ्यांनी एकत्र चर्चा करून महाराष्ट्रात या अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. याला कोणताही राजकीय रंग देता कामा नये. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा परत आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने घेतली पाहिजे”, असंही त्या म्हणाल्या.