पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात शरद पवारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अतुळ भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव आहे, हे अतुल भातखळकरांना कसं कळालं? ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- “…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला जर जास्तीची काही माहिती असेल आणि ईडीकडून पेपर लीक होत असेल, तर मला दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल. कारण ईडीचे कागदपत्रे काही लोकांकडे लीक होत असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.

हेही वाचा- “महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अतिशय विनम्रपणे विनंती करते की, त्यांनी याबाबतची चौकशी लावावी. ईडीचे कागदपत्रे अशाप्रकारे लीक होणं देशासाठी हानीकारक आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे मी अमित शाहांकडे न्याय मागणार आहे. कारण मला देशाची काळजी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm