आरक्षणाच्या बाबतीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे, ती राज्याच्या हिताची नाही. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बातमीची हेडलाईन करण्यासाठी फडणवीसांना शरद पवारच लागतात. केंद्रापासून दिल्लीपर्यंत १० वर्षे झाली, भाजपाचं सरकार आहे. तरीही शरद पवारांवर टीका करण्यात येते.”
“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविरोधात व्यक्तव्य केल्याचं दाखवावं”
शरद पवारांवरील टीकेवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “आपण अयशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणे, हे त्यांचे पहिल्यापासून काम आहे. शरद पवारांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचे दाखवून द्यावे,” असे आव्हान आव्हाडांनी फडणवीसांना दिलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“शरद पवार यांना मराठा आरक्षण देण्याबाबत अनेक वेळा संधी मिळाली. मात्र, त्यांनी आरक्षण दिले नाही. मराठा समाजाच्या लोकांना झुंजवत ठेवायचे असे त्यांचे धोरण होते. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबद्दल बोलतात त्यावेळी आश्चर्य वाटते. त्यांनीच मंडल आयोगाचा विरोध केला होता आणि त्यामुळे छगन भुजबळ बाहेर पडले होते,” असे फडणवीसांनी म्हटलं.