राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर ही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे, यावर बोलाताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कायदा योग्य ते काम करेल, मी काय बोलणार. एक तरी मी ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं? ”
कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर… –
तसेच, “या निमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या कृतीच्या विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं कुठल्याही समाजात जगामध्ये कोणी तिचं समर्थन करु शकत नाही.” असंही सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं.
महागाईवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी –
याचबरोबर पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “माझी पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घ्यावी. सगळं राजकारण बाजूला ठेवून आज महागाईवर सगळी राज्ये आणि केंद्र सरकार एक देश म्हणून आपण काय करू शकतो, यावर चर्चा करणे हे आता काळाची गरज आहे. हे मी मागील जवळपास तीन महिने आणि संसदेतील दीड महिन्यातील सगळ्या भाषणात बोलत आहे.” असं सांगितलं.
…तर मग १०८ वेळा तुम्ही काय केलं? –
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरून बोलताना सुप्रिया सुळेंनी म्हटले की, “अनिल देशमुखांना अटक करून अनेक महिने झाले आहेत. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आरोप करणारा माणूस गायब आहे आणि त्यांच्यावर १०९ वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. १०९ वेळा जर तुम्हाला रेड करावी लागत आहे, तर मग १०८ वेळा तुम्ही काय केलं? यांना काहीच नाही मिळालं म्हणून तर त्यांना इतक्या वेळेला रेड करावी लागत आहे.”