गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना आज घडली. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काही वेळापूर्वीच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होईल म्हणाल्या होत्या तो हाच आहे का? असा थेट प्रश्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“आम्ही या देशाच्या तत्त्वाला हरताळ फासला जाऊ नये म्हणून आम्ही काम करतो आहे. मला कुठल्याही जातीचा अपमान करायचा नाही. पण सगळेजण आपल्या जातींसाठी उभे राहातात गुणवंतांसाठी कुणीही उभं राहात नाही. ती जबाबदारी ही मी आणि जयश्री पाटील यांनी स्वीकारली आहे. आज माझ्या कारची तोडफोड करण्यात आली त्यामागे कोण आहे? जी आक्रमकता आज दिसली त्यावरुन हे सगळं नियोजनबद्ध असू शकतं असं म्हणायला वाव आहे.”

हे पण वाचा- “गुणरत्न सदावर्तेंची कार फोडणाऱ्यांविषयी आम्हाला आदर, कारण..”, कुठल्या नेत्याने केलं वक्तव्य?

तोडफोड करणारे चिल्लर

“अशी तोडफोड करणारे चिल्लर लोक असतात. त्यांचे गॉडफादर किंवा मास्टरमाईंड वेगळे असतात. मी आज सकाळी प्रश्न विचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्या गतीने धावपळ करत अशा ठिकाणी पोहचत असतात. आज जेव्हा माझी कार फोडली तेव्हा त्यांना काहीच बोलावं असंही वाटलं नाही का? आम्ही भ्यायलो नाही. चिल्लर लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे. मला देवेन भारती यांनी तातडीने काही अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ते आज मी सांगणार नाही. लवकरच काही अहवाल येतील.”

सुप्रिया सुळेंनी उत्तर द्यावं

“जे आरोपी अटकेत आहेत ते कुणाच्या तरी सांगण्यावरुन हे करत असतात. चौकशी तर होऊ द्या. सत्य बाहेर येईल. गुणरत्न सदावर्ते घाबरत नाही. मी हल्लेखोरांना सांगेन मृगजळाच्या मागे जाऊ नका. आरोपीच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले. त्यामुळे मला वाईट वाटलं. मुलाची शिक्षा आई भोगत असते हे त्या मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रिया सुळेंना विचारायचं आहे वकिलांचा करेक्ट कार्यक्रम करते असं त्या म्हणाल्या होत्या तो करेक्ट कार्यक्रम हाच आहे का? ” असा प्रश्न आता गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule said about lawyer correct program is this about me asks gunaratna sadawarte scj