Supriya Sule महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कवठे-महांकाळ या ठिकाणी घेतलेल्या सभेत महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ज्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील होतं. मी पाटील कुटुंबाची माफी मागितली आहे. कारण मला ते विधान पटलं नाही असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार आर. आर. पाटील यांच्याबाबत काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, “केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.”

देवेंद्र फडणवीसांनी मला फाईल दाखवली-अजित पवार

“राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबांनी तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं” असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मंत्री झाल्यानंतर तुम्ही शपथ घेता ती गोपनीयतेची असते. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फाईल दाखवलीच कशी? महाराष्ट्राशी हा विश्वासघात नाही का? ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप कुणी केले होते? तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यामुळे उत्तर त्यांना द्यावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवण हे चिंताजनक आहे. असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या आहेत. मुंबई तकशी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

हे पण वाचा- Prithviraj Chavan on Ajit Pawar: अजित पवारांच्या चौकशीचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाला सॉरी म्हटलं-सुप्रिया सुळे

आर. आर. पाटील हे माझ्या भावाप्रमाणे होते. त्यांचं निधन ९ वर्षांपूर्वी झालं. आता त्यांच्या निधनानंतर अजित पवारांनी अशा प्रकारे आरोप करणं हे चुकीचं आहे. तसंच मला त्या आरोपामुळे मला खूप दुःख झालं. ७० हजार कोटींचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला पाहिजे. मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली मी त्यांना सॉरीही म्हटलं. कारण मला खूप दुःख झालं. आर. आर. पाटील यांचं निधन ९ वर्षांपूर्वी झालं आहे. आज त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल? हे वाटूनच मी त्यांना सॉरी म्हटलं. आर. आर. पाटील अत्यंत इमानदार नेते होते. विरोधकांनी मागणी केल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी संमती दिली कारण जर आरोप खोटे असतील तरीही ते झाले आहेत त्यामुळे आर. आर. पाटील यांनी निष्पक्षपणे चौकशी लावली असेल ही बाब कौतुकास्पद आहे. यावर आत्ता अशाप्रकारे आरोप होणं हे वेदनादायी आहे असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule said i feel sorry for r r patil family so i apologized them what she said about ajit pawar scj