Supriya Sule : आर. आर. पाटील सोडले तर राजकारणतली कुठल्याही नेत्याची मुलं मराठी शाळेत गेली नाहीत. मी देखील कॉनव्हेंटमध्येच शिकले. पवार कुटुंबातली मी पहिली मुलगी आहे जी इंग्रजी शाळेत म्हणजे कॉनव्हेंटमध्ये शिकली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच सुप्रिया सुळे यांनी आपण इंग्रजी शाळेत का गेलो याचा किस्सा सांगितला ज्यामुळे सभागृहात हशा पिकला. याची हेडलाइन करु नका असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
यशस्वी झाल्यानंतर नापास झालेल्या मुलांची कथा फार चांगली वाटते. कुठलंही मूल धन असतं ह्या मताची मी आहे. मला दोन मुलं आहेत, ते वाढवताना एवढा त्रास होतो. परंतु शिक्षक चाळीस मुलांना सांभाळतात. त्या मुलांची आयक्यूची पातळी वेगवेगळी असते. तरीही शिक्षक त्यांना ते सांभाळतात हे विशेष आहे. तंत्रज्ञान येतं त्यात शिकावं या मताची मी आहे, मला पण ते आवडतं. परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते. चॅट जीपीटीची भीती वाटतेय. जीपीटीच्या माध्यमातून पोर गृहपाठ करायला लागली तर मेंदूचं आकलन कसं होईल? हा खूप गंभीर विषय असल्याची भीती खासदार सुप्रिया सुळेंनी बोलताना व्यक्त केली आहे.
माझं गणित आधीही कच्चं होतं, आताही कच्चं आहे-सुप्रिया सुळे
तंत्रज्ञानामुळे केवळ शिक्षकांची नोकरी जाणार नाही, कारण शिक्षक ही नोकरी नाहीये तर ती सेवा आहे. आई-वडिलांनंतर माझ्यावर संस्कार हे शिक्षकांनी केले. माझं गणित अगोदरही कच्चं होतं आताही कच्चं आहे. कारण मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण मला जास्त काही मोजावं लागत नाही. इन्फ्रा-स्ट्रक्चरला एवढे पैसे दिले जातात, मग शिक्षणाकडे का लक्ष दिले जात नाही? इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं या मताची मी आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, त्याकडे प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी दिला नाही तर एक पिढी शिकू शकत नाही. शिक्षणात राजकारण येऊ नये, या मताची मी असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे पण वाचा- Supriya Sule: “बीड हत्या प्रकरणाची दिल्लीत देखील चर्चा”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
आता याची हेडलाईन करु नका-सुप्रिया सुळे
माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी मराठी शाळेत शिकलं पाहिजे. पण आमच्या घरात आमच्या आईचं चालतं त्यामुळे मला इंग्रजी शाळेतच पाठवण्यात आलं. आमच्या घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं, तो भाग वेगळा. बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील. असा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे भाष्य केलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित १५ वी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.