Supriya Sule : येत्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मी आणि अमोल कोल्हे चिंतेत होतो, पण तुमची ताकद होती त्यामुळे आम्ही निवडून आलो, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“आमदार, पदाधिकारी, कारखान्यातले पदाधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पंचायती सगळे सोडून गेले. मी आणि अमोलदादा (अमोल कोल्हे) रोज विचार करायचो आता पुढे काय होणार? आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहीत नव्हती. पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात. संघर्षाच्या काळात आम्ही काळजी करत होतो कारण पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं, नेते नव्हते काहीही नव्हतं. आम्ही दोघं एकमेकांना समजावत होतो. पण आता आम्हाला कळतंय की मतदार राजा आमच्याबरोबर होता. बाकी सगळे निघून गेले होते.” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) अजित पवारांना टोला लगावला.
हे पण वाचा- Supriya Sule Phone Hacked: व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं आवाहन; पोलिसांकडे केली तक्रार
आम्हाला जनतेनं निवडून दिलं
आमचं भाग्य आहे की आम्हाला तुम्हा सगळ्यांचा विश्वास, प्रेम आम्हाला लाभलं हेच नातं आम्ही कायम ठेवू. बारामती ही आपली आन, बान आणि शान आहे. नवले ब्रिजवर अपघात व्हायचे आपण नितीन गडकरींची मदत घेतली. आता इंदु चौकातही आपल्याला तसाच मार्ग काढायचा आहे, तो रस्ता आता आपल्याला सुधारयाचा आहे असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी म्हटलं आहे. पुण्यात, बारामतीत अपघात वाढत चालले आहेत, गुन्हे वाढत आहेत. चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर आपल्याला सरकार बदलायचं आहे हे लक्षात ठेवा. येत्या काही महिन्यांमध्ये आपलं सरकार येणार आहे. असंही सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.
१५०० रुपयांनी नाती जोडली जात नसतात
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मला परवाच एका पत्रकाराने सांगितलं की बारामतीत जे घडलं ते अपेक्षित नव्हतं. मी त्यांना सांगितलं की लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे. मी अंडर कॉन्फिडंट होते आणि ते ओव्हर कॉन्फिडंट होते. पण आज तुम्हाला सांगते बारामती आणि शिरुर मतदारसंघ एकाच माणसाला कळतो त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. शरद पवार आणि तुमचं हे प्रेमाचं नातं आहे ते काही कुठल्या योजनेचं नातं नाही. एक लक्षात घ्या नाती १५०० रुपयांनी जोडली जात नाहीत. कुणीतरी म्हणालं की एक गेली म्हणून बाकीच्या बहिणी जोडल्या. पण तसं होत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेवरुनही अजित पवारांना टोला लगावला. पैशांच्या नात्याने व्यवहार होतात, नातं जुळत नाहीत. झालं गेलं गंगेला मिळालं त्यांनाही शुभेच्छा जिथे असेल तिथे सुखाने नांदा. असंही सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या.
येत्या काही महिन्यांत आपलं सरकार
रविवारी माझा फोन हॅक झाला. मी जयंत पाटील यांना मेसेज केला तर भलतंच कुणीतरी उत्तर देतं आहे. मी म्हटलं पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळं गेलं आता मोबाइलही हॅक झाला होता असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आता फोनमुळे सगळं गेलं, किती वाजले ते पण फोनवर पाहतो. येत्या काही महिन्यांत आपलंच सरकार येणार आहे. काहीही झालं तरीही तुतारी विसरायची नाही तिला फार महत्त्व आहे असंही सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd