अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार बरोबर घेऊन तीन महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याने ते सरकारमध्ये सामील झाले आहेत, असा दावा महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे आमदार लवकरच अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागेल, असा दावाही विरोधक करत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.” इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन.

हे ही वाचा >> “भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”

सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जे काही बोलले त्याचं मी स्वागत करते. पण ते अजित पवारांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी ठेवणार म्हणालेत ना? म्हणजे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आणि फडणवीसांच्या म्हणण्यानुसार पुढची पाच वर्ष अजित पवार मुख्यमंत्री होणार, तर मला आनंद आहे. अजित पवार पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असतील तर याचा मला आनंद आहे. दादा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना पहिला हार घालायला मी जाईन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule says ajit pawar becomes chief minister of maharashtra i will congratulate him first asc