महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिन्यात (२०२३) मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार हे पक्षातील काही आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून दोन्ही गटाचे नेते सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं. “राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे”, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यापाठोपाठ ट्रिपल इंजिन सरकारमधील अजित पवारांचा गट नाराज असून देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून अजित पवार गटाला आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधला एक गट नाराज आहे. यांच्या सरकारला तीनच महिने झालेत. यांचा अजून हनीमूनही संपला नाही आणि यांच्या नाराजीच्या बातमी येऊ लागल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, यांचं ट्रिपल इंजिन सरकार बनून केवळ तीनच महिने झाले आहेत, आणि आज सकाळीच एक बातमी आली आहे की, यांच्यात एक गट नाराज आहे. ट्रिपल इंजिन सरकारमधील एक गट नाराज असून हा गट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटला आहे. कारण त्यांची नाराजी आहे. ही बातमी खरी-खोटी माहिती नाही. परंतु, तुमच्या सरकारला आत्ता फक्त तीनच महिने झाले आहेत. तुमचा हनीमूनही अजून संपला नाही आणि तुमची नाराजी कशी काय सुरू झाली? तीन महिन्यांच्या आतच यांच्यात या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला लागल्या आहेत. याचा अर्थ सरकार चालवतंय कोण?
हे ही वाचा >> नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले…
कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपा नेहमीच बॉस असली पाहिजे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबर असले तरी राज्यात भाजपाच बॉस असली पाहिजे”. फडणवीसांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र पक्षांना कसं वागवते? हे मी नऊ वर्षे दिल्लीत फार जवळून पाहिलं आहे. फडणवीसांच्या वक्तव्याचं मला आश्चर्य वाटलं नाही. परंतु, हे ज्यांना माहीत नसेल त्यांना मी तरी काय म्हणू…”, असं वक्तव्य करत खासदार सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला आहे.