देशभरातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अनेक पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चा चालू आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीन मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडी आगामी काळात महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. अनौपचारिक पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. येत्या ८-१० दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

हे ही वाचा >> “संघ आणि भाजपाने हिंदू-मुस्लिम वाद अंतिम टोकावर आणला आहे, आता…”; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. पाटील म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule says maha vikas aghadi made seat sharing formula for lok sabha election 2024 asc
Show comments