शिर्डी येथे चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मार्गदर्शन केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल. आपलं सरकार आल्यावर सर्वप्रथम आपण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आपल्याकडे (शरद पवार गट) गृहखातं आल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करू. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या. आबांच्या (आर. आर. पाटील) काळात राज्यात जशी कायदा आणि सुव्यवस्था होती तशीच पुन्हा निर्माण करू.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. आपण सत्तेत आल्यावर आपण लोकांसाठी सर्वप्रथम काय करणार? आपला म्हणजेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यावर त्या मुख्यमंत्र्याची पहिली सही ही अंगणवाडी सेविकांसाठी असेल. तसेच धनादेशावरील पहिली सही ही शेतकऱ्यांसाठी असेल. या महाराष्ट्रातील कष्टकऱ्याची म्हणजेच इथल्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी आपला मुख्यमंत्री धनादेशावर पहिली सही करेल. हा माझा शब्द आहे. मी पुन्हा सांगते, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा.
मानधन वाढ आणि पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांची आंदोलनं चालू आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली जाईल, असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
शिर्डीत पक्षाच्या शिबिरात केलेल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपलं सरकार महिला सुरक्षेलादेखील प्राधान्य देईल. आपण महिलांना सुरक्षा कशी देणार? एकदा आपल्या सरकारचा याआधीचा कारभार आठवून पाहा. आर. आर. आबा आणि अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं. तेव्हा जशी व्यवस्था होती, तशी पुन्हा निर्माण केली जाईल. राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा, मुलगी घराबाहेर पडले की, ते परत येतील की नाही याची काळजी वाटते. मी तुम्हाला शब्द देते, राज्यातल्या लेकींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं जाईल. हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे.
हे ही वाचा >> ‘रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण’, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर अमोल कोल्हेंचं श्रीरामावर भाष्य
‘मोदी की गॅरंटी’वर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या ‘मोदी की गॅरंटी’ (पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी) या घोषणेवर टीका केली. त्या म्हणाल्या, मी राज्यातल्या जनतेला शब्द देते की, राज्यात महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलं जाईल. हा माझा शब्द आहे. ही काही गॅरंटी नाही, कारण गॅरंटी मर्यादित काळासाठी असते. शब्दाला आयुष्यभर किंमत असते. गॅरटी एक वर्ष, तीन वर्षे किंवा पाच वर्षांसाठी असते, परंतु, शब्द कायम असतात. त्यामुळे ही स्वाभिमानी मराठी मुलगी तुम्हाला शब्द देत आहे की, महिला सुरक्षितता हा तुमच्या माझ्या सरकारचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल.