अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता खुद्द सुप्रिया सुळेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात, असं म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चार ट्वीट्स केले असून त्यातून आपलं म्हणणं मांडलं आहे. “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात”, असं त्या म्हणाल्या आहेत.
“सगळेच तारतम्य पाळतात असं नाही”
अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच सुप्रिया सुळेंनी खोचक टोलाही लगावला आहे. “सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. पण जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करुयात”
दरम्यान, महिलांचाच सन्मान जपण्याची महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही सुप्रिया सुळेंनी केलं आहे. “मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया”, असं ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी नमूद केलं आहे.
“राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून हा ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!” असंही सुळेंनी ट्वीटम्ये म्हटलं आहे.