भारतीय जनता पक्षाते आमदार आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंज बंगल्यावर त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा मिळवण्यासाठीच आशिष शेलार त्यांना भेटल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, लवकरच यासंदर्भात घोषणा होणार असल्याचंही बोललं जात असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यात त्यांनी भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “पक्षफोडले, घरं फोडली, आता राज् ठाकरेंना भेटायला गेले. कितीही ताकद त्यांनी लावली, फोडाफोडीचं राजकारण केलं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर केला, तरी त्यांना कॉन्फिडन्स नाहीये की ते जिंकू शकतील. यातच सगळं आलं”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

जयंत पाटील भाजपात जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. एकीकडे जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावलं असताना सुप्रिया सुळेंनी त्यावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे.

‘आम्ही सेल्फी काढत फिरत नाही’, म्हणणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या “मोदींचा एक…”

“देशमुख, जयंत पाटील अशा सगळ्यांबद्दल रोज चर्चा असते. २०० आमदार, ३०० खासदार एवढी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे ना. एवढी ताकद असताना त्यांना आमच्यासारखे छोटे राहिलेले पक्ष हवेहवेसे वाटतात. काहीतरी असेल ना आमच्यात?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर टीकास्र

जयंत पाटलांनी मोदींची विकासनीती मान्य केल्यास त्यांना भाजपात घ्यायला तयार आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच सुप्रिया सुळेंनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. “घ्यायला तयार आहोत म्हणजे? हा कसला उद्धटपणा आहे? हे भाजपाचे संस्कार आहेत? मला आश्चर्य वाटतंय. मी भाजपाला फार जवळून पाहिलंय. अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज असे किती मोठे नेते आम्ही पाहिले आहेत. त्यांच्यात अहंकार अजिबात नव्हता. ही अहंकाराची भाषा कसं काय भाजपा करतेय. एवढा सुसंस्कृत पक्ष होता. काय झालंय त्या पक्षाला?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule slams bjp ashish shelar meets mns raj thackeray pmw