गेल्या महिन्याभरापासून राज्यसभा निवडणुकांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आधी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अखेर शिवसेनेनं अपक्ष म्हणून पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजेंनी माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा मुद्दा चर्चेत आला. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी एकमेकांना एकमेकांच्या बरोबर उलट प्रस्ताव देण्यात आले. परिणामी कुणीही माघार घेतली नाही आणि आता ही निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सहाव्या जागेवरील आपल्या उमेदवाराला भाजपाने पाठिंबा द्यावा, त्याबदल्यात विधानपरिषदेची जागा भाजपासाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला होता. तर त्याउलट भाजपासाठी राज्यसभेची जागा सोडल्यास परिषदेची जागा महाविकास आघाडीला देण्याचा प्रस्ताव भाजपानं दिला. दोन्ही बाजूंना ही अट मान्य न झाल्यामुळे कुणीही अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे आता ही निवडणूक होणार असून दोन्ही बाजूंनी ती जिंकण्याचे दावे केले जात आहेत. त्यात आता सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“हा तर आमचा मनाचा मोठेपणा”
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांना स्वत:हून भेटायला गेलं, हा महाविकास आघाडीचा मनाचा मोठेपणा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. “हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ नेते स्वत:हून पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीसांना विनंती करायला गेले. हा महाविकास आघाडीचा स्वत:चा मनाचा मोठेपणा आहे की ते स्वत:हून गेले. पण आता घोडेबाजार वगैरे गोष्टी माध्यमांत वाचायला मिळतायत. हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे. जवळपास दोन दशकांनंतर अशी निवडणूक होणार आहे. हे कोणत्याही राज्याच्या राजकारणासाठी हिताचं नाही”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
सोनिया गांधींना पाठवलेल्या नोटिशीचं आश्चर्य नाही
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस पाठवल्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “मला यात फार आश्चर्य वाटत नाही. केंद्र सरकार हे सूडाचं राजकारणच करतंय. ज्या महिलेने इतकी वर्ष देशाची सेवा केली, त्या महिलेला ईडीची नोटीस पाठवणं हे दुर्दैव आहे. भाजपाच्या लोकांनी काहीतरी नवीन पद्धत सुरू केली आहे”, असं त्या म्हणाल्या.