Supriya Sule on Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर आता सर्वत स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंगळवारी बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी जवळपास १० तास रेलरोको केला. यादरम्यान सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून लाठीचार्ज करून आंदोलकांना रेल्वे स्थानकातून हटवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर पुण्यात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी आज माध्यमांशी बोलताना बदलापूरमधील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलनं करणार. जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी”, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुरक्षा काढून घेण्याची केली विनंती
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आज सकाळी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना दिलेली सुरक्षा काढून घेण्याची विनंती सरकारला केली आहे. त्यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यावर सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. “तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, अगदी त्या आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षा दिला आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
काय म्हटलंय सोशल पोस्टमध्ये?
सुप्रिया सुळेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. “महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंवर या घटनेचं राजकारण करत असल्याची टीका केली होती. त्यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. “ही लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कितीही आरोप केले तरी मला चालेल. पण मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आई, बहीण, लेक, नागरिक म्हणून विनम्रपणे विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात. राज्यातल्या महिलांची, नागरिकांची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. ज्या नराधमांनी असं गलिच्छ कृत्य केलं, त्याला फाशी देण्यासाठी यंत्रणा आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला संविधानानं दिला आहे. हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे. आंदोलन केल्यामुळे आम्हाला शिक्षा होत असेल तर ती आम्हाला मान्य आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.