Supriya Sule Speech: हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला. बरोबर पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी अशाचप्रकारे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण त्याच्याही आधी २०१४ च्या निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला इंदापूरमध्ये पुरेशी मदत केली जात नसल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील करत होते. त्याच तक्रारीचा पुनरुच्चार करत पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. आता भाजपातून राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर पूर्वीच्या वादांचं काय होणार? असा प्रश्न चर्चेत आला आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.
काय होती हर्षवर्धन पाटील यांची तक्रार?
हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करताना व त्याही आधी काही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणूनबुजून मदत केली जात नसल्याचा दावा केला होता. पाटील यांचा इंदापूर हा सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी आपली मदत घेतल्यानंतर विधानसभेला इंदापुरात आपल्याला मदत केली नाही, असा आरोप तेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. त्यानंतरही गेल्या पाच वर्षांत भाजपामध्ये गेल्यावर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.
हर्षवर्धन पाटील यांच्याप्रमाणेच सुप्रिया सुळे व स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पाटील यांना वारंवार लक्ष्य केलं होतं. २०१९ ला पाटील राष्ट्रवादीवर टीका करत काँग्रेस सोडून भाजपात गेले तेव्हा सुप्रिया सुळेंनी “दीराशी भांडण आहे तर नवऱ्याला का सोडायचं?” असा खोचक सवाल केला होता. मात्र, आता हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आल्यानंतर हे सगळे पूर्वानुभव विसरून काम कसं होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली आहे.
वादांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेतच सुप्रिया सुळेंनी याआधी झालेल्या वादांना पूर्णविराम दिला. “आज मला अतिशय आनंद होतोय की हर्षवर्धन पाटील आमच्याकडे येत आहेत. आम्ही एकत्र अनेक वर्षं काम केलं आहे. मला पत्रकार अनेकदा विचारतात की आता तुमचं काम कसं चालेल? मी एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छिते. मी राजकारणात आल्यावर व त्या आधीपासूनही हर्षवर्धन पाटील व आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. ते आजचे नसून सहा दशकांचे आहेत. ते पाटील व पवार कुटुंबांनी अतिशय प्रेमाने मानले आहेत”, असं त्या म्हणाल्या.
“राजकारणात काही झालं असेल तर ठीक आहे. त्यामागे काही तेव्हाची कारणं असतात. पण आपल्या प्रत्येकात तेवढी वैचारिक प्रगल्भता आहे की जे काही विसरुया व पुढे कामाला लागूयात. कारण आपण आज सगळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलो आहोत”, असंही त्यांनी नमूद केलं.
“हा जनतेचा उठाव” म्हणत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात; झोपेबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले…
हर्षवर्धन पाटलांना सुप्रिया सुळेंची विनंती!
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटलांना एक विनंती केली. “माझी हर्षवर्धन पाटील यांना विनंती आहे. ती मीही पाळणार आहे. आपण अनेक वर्षं एकत्र राहिलो आहोत, पुढेही एकत्र राहू. आपल्यात इतक्या वर्षांमध्ये कधीच कटुता आली नाही. पण अनेक वर्षं आपल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संघर्ष केला आहे. मात्र आता प्रत्येक कार्यकर्त्याचा मान-सन्मान करणं ही आपल्या दोघांचीही जबाबदारी असेल. आता इथले-तिथले, आधीचे-नंतरचे ही भाषा आपण सगळ्यांनीच बंद करूयात. जे झालं ते पाहून इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे इंदापूरसाठी आपण एकत्रपणे काय करता येईल हे पाहायला हवं. माझी तु्म्हाला विनंती आहे की आमच्या लोकांना थोडंसं समजून घ्या. ते आजनंतर आपले आहेत. तुम्ही मोठे भाऊ म्हणून प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याला समजून घ्या. प्रेमानं तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवला, तरी त्यांना पुरेसं आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.