Supriya Sule on Sharad Pawar and Ajit pawar : शरद पवार आणि अजित पवारांनी आता एकत्र यावं, अशी अपेक्षा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होणार या चर्चेला जोर आला होता. याविषयावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या. परंतु, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आज त्यांनी या विषयावर त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या आशाताई पवारांच्या विधानाबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्या अगदी नम्रपणे म्हणाल्या, “मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही, कारण मी लोकसेवेत आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “माझं कुटुंब वेगळं आहे. माझ्या कुटुंबाबाबत माझ्या मनात कधीच अंतर नव्हतं. लोकसभेच्या मतदानानंतरही मी पहिल्यांदा आशाकाकींच्या पाया पडायला गेले. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी कधीच गल्लत करत नाही.” तसंच, आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> Ashatai Pawar : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून विठूरायाला साकडं, वर्षभरात…”, आशाताई पवार काय म्हणाल्या?

आशाताई पवार नेमकं काय म्हणाल्या होत्या?

हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगलं जाऊदेत असं साकडं पांडुरंगाला मी घातलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊदेत असंही सांगितलं आहे. मला वाटतं की वर्षभरात हे दोघं एकत्र येतील. सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समाधानाचं जाऊदेत असंही साकडं मी घातलं आहे असंही आशाताई पवार यांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून मी प्रार्थना केली. पांडुरंग माझं ऐकणार असा विश्वास वाटतो असंही आशाताई पवार म्हणाल्या. आशाताई पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रोहित पवार काय म्हणाले?

“देवासमोर जाऊन मनातल्या गोष्टी बोलणं ही आपली परंपरा आहे. तिथे जाऊन त्यांच्या मनातील गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. शेवटी त्या राजकारणात नाहीत, त्या समाजकारणामध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली ती व्यक्तिगत पातळीवर कुटुंब म्हणून आम्हा सगळ्यांचीच आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. एकत्र येण्यासंबंधी निर्णय दोन्ही पक्षांचे प्रमुख घेतील असे सांगताना रोहित पवार पुढे म्हणाले की, “पण राजकारण जेव्हा पाहिलं जातं तेव्हा शेवटी त्या त्या पक्षाचे प्रमुख…आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत, पलिकडच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule stand on discussion on ajit and sharad pawar coming together sgk