बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.
मी रोज महायुतीतल्या लोकांचे रुसवे-फुगवे पाहते आहे-सुप्रिया सुळे
मी सरकारवर टीका करणार नाही. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं आहे. मी रोज चॅनल्सवर रुसवे-फुगवे पाहिले आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलं जातं. कामाला लागण्याऐवजी हे सरकार रुसव्या फुगव्यांमध्ये अडकलं आहे. महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत. जीडीपी कमी झाला आहे. राज्यासमोर आणि देशासमोर खूप आव्हानं आहेत. बेकारी, अर्थव्यवस्था यावर या सरकारने गांभीर्याने चर्चा करायला हवी होती पण तसं दिसत नाही. तसंच बीड आणि परभणी या ठिकाणी झालेल्या दोन्ही घटनांचा मी जाहीर निषेध नोंदवते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की हा विषय त्यांनीही गांभीर्याने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे.
पार्टी विथ डिफरन्सचं असं का झालं?
खातेवाटप का झालेलं नाही कल्पना नाही. मात्र तीन आठवडे पूर्ण होऊनही आधी मुख्यमंत्री निवडीसाठी वेळ, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ आणि आता अजून खातेवाटप नाही. भाजपा अभिमानाने म्हणायचा की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत. मात्र आता महाराष्ट्रात असं का होतं आहे? हे महाराष्ट्राला शोभणारं आणि अस्वस्थ करणारं आहे. अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. जनतेने जो कौल दिला तो विश्वासाच्या नात्याने दिला आहे. आता काम कधी सुरु होणार या प्रतीक्षेत महाराष्ट्र आहे आणि मीदेखील आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
छगन भुजबळांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“छगन भुजबळ यांना मंत्री का केलं गेलं नाही? हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र छगन भुजबळ आमच्याबरोबर असेपर्यंत शरद पवार यांच्या बरोबरीनेच छगन भुजबळ यांचा मान ठेवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांची खुर्चीही शरद पवारांच्या शेजारीच असे. प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारी देण्याचा विषय असे तेव्हा छगन भुजबळ यांचंच नाव पुढे असायचं. शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ ताकदीने उभे राहिले हे मी कधीच विसरणार नाही. मागच्या दीड-दोन वर्षांत ज्या घटना घडल्या त्याला अनेक कारणं आहेत. मला त्यात आता पडायचं नाही. मात्र हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.