कराड : ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी सत्तेत आल्याचे म्हणत असले, तरी विकास सोडून सर्वकाही सुरू आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. इथले उद्योग अन्य राज्यांत पळवले जात आहेत. प्रगतीचा वेगही मंदावत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधिस्थळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील या वेळी उपस्थित होते.
जाती-जातींत तेढ निर्माण होतेय. हे सारे केंद्र सरकारमधील अदृश्य शक्तीचे षडय़ंत्र असून, मराठी नेत्यांबरोबरच मराठी माणसाचाही घात होत असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली. महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. सध्याचे गृहमंत्री यापूर्वी यशस्वी राहिले असले, तरी त्यांचा सध्याचा कालावधी अपयशी असल्याचे सुळे या फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाल्या.अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांची भाजप आता राहिली नाही. आता ती भ्रष्ट जुमला पार्टी बनली आहे. इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीच्या कारवाया केवळ महाराष्ट्रातच कशा होतात असा प्रश्न करून, महाराष्ट्राच्या खच्चीकरणासाठी केंद्रातील अदृश्य शक्ती सतत कार्यरत असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.
हेही वाचा >>>सातारा: खंडाळा पंचायत समितीला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचा विसर
भुजबळांची वक्तव्ये दंगली घडविण्यासाठी..
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांची वक्तव्ये समाजात दंगली घडवणारी वाटतात का, असे विचारले असता, हो तसेच दिसतेय, असे सांगत मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. परंतु, त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून त्यात चर्चा करायला हवी, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.