महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. परंतु, अजित पवार गट या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला संधी देणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. गेल्या काही दिवसांमधील अजित पवार गटातील नेत्यांची वक्तव्ये, कार्यकर्त्यांचे होर्डिंग्स पाहता अजित पवार त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतात. त्यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगू शकतो. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी बारामती येथे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. सरकारच्या बारामतीत होणाऱ्या रोजगार मेळाव्याविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या, आतापर्यंत मला कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं नाही. मला या सर्व कार्यक्रमाची माहिती पत्रकारांकडून मिळाली आहे. तसेच मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात या कार्यक्रमांविषयी २०१५ च्या शासकीय अधिसूचनेनुसार स्थानिक खासदारांचं नाव घ्यावं लागतं. हा राज्य आणि केंद्र सरकारचा प्रोटोकॅाल आहे. राज्य सरकार हा प्रोटोकॉल फॉलो करणार की नाही ते माहिती नाही. केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संसदेत वारंवर या प्रोटोकॉलचा उल्लेख करत असतात.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी मुंबईतल्या पिण्याच्या पाणीटंचाईवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन ओला दुष्काळ पडला आहे. तर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सभागृहात याबाबत चर्चा व्हायला हवी.

हे ही वाचा >> “…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत चालू असलेल्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याविरोधात कोण लढणार आहे हे मला माहित नाही. अजून विरोधकांचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीतरी माझ्याविरोधात लढलंच पाहिजे. लोकशाहीत विरोधक असायलाच हवा. विरोधक दिलदार असेल तर मजा येते. बाकी माझ्याविरोधात कोण लढणार वगैरे गोष्टींवर मी आत्ताच कुठलंही भाष्य करणार नही. ज्यावेळी इतर उमेदवार निवडणुकीचा अर्ज भरतील तेव्हा मी त्यावर बोलेन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule talks on baramati lok sabha election 2024 sunetra pawar ajit pawar rno news asc