राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची एकीकडे प्रतीक्षा असताना दुसरीकडे शरद पवार गट थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भातलं वृत्त शरद पवार गटाकडून फेटाळण्यात आलं असलं, तरी राहुल नार्वेकरांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही या चर्चेवर पडदा पडलेला नाही. त्यासंदर्भात आज शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच, अपात्रता प्रकरणावरही भाष्य केलं.
“…तर आम्ही कोर्टात जाऊ”
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच सुप्रिया सुळेंनी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. “जर शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरले, तर आम्ही कोर्टात जाऊ. त्यात समस्या काय आहे?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“ज्या माणसानं पक्ष काढला…”
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालावरही तोंडसुख घेतलं. “राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष शरद पवारच आहेत. त्यामुळे संस्थापक सदस्याकडून, ज्यानं पक्ष स्थापन केला, त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृश्य शक्ती करत आहे. हा पक्षातच नाही, तर देशात एक नवीन पायंडा पाडला जातोय. कारण एखादा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो. इतिहासात त्याची नोंद होते. ज्या माणसानं पक्ष काढला, त्याच्यावर अन्याय करून त्याचं चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला जातोय. त्याच्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार?
दरम्यान, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. “ज्यांनी ही बातमी सर्वात आधी ब्रेक केली, त्यांना माझी विनंती आहे की किमान स्वत:च्या विश्वासार्हतेसाठी तरी अशा वावड्या उठवू नका”, असं त्या म्हणाल्या.
“श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाणांचं नाव होतं”
“अशोक चव्हाणांबाबत मला आश्चर्य वाटतंय. कारण श्वेतपत्रिकेची चर्चा गेल्या आठवड्यात संसदेत झाली. त्यावर भाजपाच्या मुख्य नेत्यांनी आदर्श घोटाळा व अशोक चव्हाणांचं नाव घेतलं होतं. निर्मला सीतारमण यांनी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं नव्हतं, पण आदर्श घोटाळ्यावर बोलल्या होत्या. त्यामुळे आधी आरोप करा आणि आठ दिवसांत त्यांना पक्षात घ्या असा नवीन ट्रेंड भाजपानं सुरू केला आहे”, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.