राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर मागील काही काळापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने टीका करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी मागील दोन महिन्यांमध्ये घेतलेल्या तीन वेगवेगळ्या सभांमध्ये शरद पवारांवर जातीयवादी असण्याचा आरोप केला तर सुप्रिया सुळेंच्या घरावर धाडी पडत नाहीत पण अजित पवारांच्या घरावर पडतात असंही वक्तव्य भाषणादरम्यान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ईडीची नोटीस आल्याने राज यांचे पवारांबद्दल मतपरिवर्तन झाल्याच्या आशयाने राज यांच्यावर निशाणा साधलेला. मागील काही आठवड्यांपासून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचे आभार मानलेत.
नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारताच अजित पवारांचा संताप; म्हणाले, “कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या…”
झालं असं की, आज सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रकरणासंदर्भात येथील पत्रकार परिषदेत सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या विषयाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सुप्रिया यांनी राज ठाकरेंचे आभार मानले.
नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : पवारांविरोधातील आक्षेपार्ह मजकूराबद्दल फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अलिकडच्या काळात…”
केतकी प्रकरणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
केतकीने केलेल्या पोस्टसंदर्भात प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी, “कायदा योग्य ते काम करेल, मी काय बोलणार? एक तर मी ओळखतही नाही तिला. (केतकी चितळेला) मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं?,” असा प्रश्न उपस्थित केलाय.
राज ठाकरेंचे आभार
शरद पवारांवर करण्यात आलेल्या या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेची भाषा योग्य नसल्याचं म्हटलं होतं. याच निषेधासाठी सुप्रिया सुळेंनी या तिन्ही नेत्यांचे आभार मानले. “यानिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या कृतीच्या (टीकेच्या) विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं जगातील कुठल्याही समाजात कोणीचं समर्थन करु शकत नाही.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज केतकी चितळेप्रकरणासंदर्भात काय म्हणालेले?
शनिवारी केतकी चितळेप्रकरणी राज यांनी एक पत्रक जारी करुन या मराठी अभिनेत्रीवर टीका केली होती. राज ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये केतकी चितळेच्या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कुणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं आपल्या पत्रात राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.
विचारांचा मुकबला विचारांनी व्हावा
शरद पवारांवर असं लिखाण साफ गैर असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. “महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत! आमचे त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत आणि राहतील. पण अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला हवा”, असं या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.
परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये
“चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं. कुणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये ही अपेक्षा”, असं देखील या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज्य सरकारकडे राज ठाकरेंनी केली कारवाईची मागणी
“पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कुणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच राज्यसरकारनं याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा”, अशी मागणी राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे केली आहे.