मागीलवर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. तर, जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून भाजपावर सडकून टीका करण्यात येत आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना फोटो ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एक्स’ अकाउंटवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. पण, केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले.”

“दोन्ही नेत्यांनी कुटुंबाचा समाजकार्याचा वासरा घेऊन डोंगराएवढं कार्य उभे केले”

“शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्याचप्रमाणे शरद पवारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचवण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले आणि देशभरात दबदबा निर्माण केला,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेते म्हणाले…

“…हे प्रेम भाजपाला बघवत नाही”

“गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करून लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांना भरभरून प्रेम दिले. पण, त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपाला बघवत नाही,” असं टीकास्र सुप्रिया सुळे यांनी सोडलं.

“राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपा करत आहे”

“शरद पवारांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येकवेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत. महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय. महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपाला आनंद मिळतो. मात्र, या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपा करत आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : शरद पवार अदाणींच्या भेटीसाठी गुजरातमध्ये, राजकीय चर्चांना उधाण; रोहित पवार म्हणाले…

“विरोधी पक्षांच्या विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही”

“लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule tweet sharad pawar balasaheb thackeray photo attacks bjp ssa
Show comments