अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं. शिवाय “राणांच्या आरोपानंतर आम्ही त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे. याबाबतीत आम्ही न्यायालयात जाणार आहोत” असेही बच्चू कडू म्हणाले आहेत. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : “सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील तर …” – सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

प्रसारमाध्यमांशी बोलतान खासदार सुळे म्हणाल्या, “बच्चू कडू हे एक संवेदनशील नेते आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. याचं कारण असं आहे की, मी स्वत: ५० खोक्यांबद्दल एवढ्यासाठीच बोलले, याचं कारण ५० खोक्यांचा आरोप झाला ते कोणी घेतले नाही हे कोणीच म्हटलं नाही. उलट या इडी सरकारमधील एक मंत्री मी ऑनरेकॉर्ड या वृत्तवाहिनीवरच मी पाहिले, की ते असं म्हणालेत की तुम्हाला ५० खोके हवे आहेत का? त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला की असा काहीतरी व्यवहार झाला असावा. अशी एक साधरणपणे जनतेच्या मनता शंका आली असावी. त्यामुळे सातत्याने ५० खोके बद्दल जी चर्चा होते, ती समाजात सगळीकडे व्हायला लागली. गाव, वाडी, वस्तीवर जरी तुम्ही भाषण करायला गेलात, तर खालून लगेच म्हणतात हे ताई बघा ५० खोके वाले आहेत. त्यामुळे ही गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेली गोष्ट आहे.”

हेही वाचा – MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान

याशिवाय “मला आनंद वाटतोय की या राज्यात सत्तेत असणारं कोणीतरी संवेदनशील आहे.त्यामुळे मी बच्चू कडू यांचे आभार मानते की त्यांनी आरोग्य क्षेत्रात अपंगांसाठी इतकं प्रचंड काम केलय आणि त्यांच्या वेदना व त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यातून दिसला आहे. मला आनंद वाटतो की सत्तेतील कोणतरी संवेदनशील राजकारणी या राज्यात आहेत.” असंही सुळे म्हणाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? –

“आपल्याला आयुष्यात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. गेल्या २० वर्षांपासून मी मेहनत करत कोणत्याही पक्षाशिवाय, झेंड्याशिवाय, पैसे खर्च न करता चार वेळा आमदार झालो. त्यामुळे राणांकडून जे खालच्या स्तरावर आरोप करणं हे मनाला दुखवणारे आहेत. राणांनी जे आरोप केले आहेत, ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही नाही. ते कोणाच्या जीवावर बोलत आहे, हे तपासणे गरजेचे आहे. राणांनी केलेले आरोप एकट्या बच्चू कडूवर नाही, तर त्यामुळे ५० आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो.”, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.