मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून मराठा आंदोलकही ठिकठिकाणी उग्र होत आहेत. त्यामुळे सरकारच्याही हालचाली वाढल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं असल्याचं मत सातत्याने राजकीय मंडळींकडून व्यक्त केलं जातंय. तर, आता सत्तेत असलेले आमदारही या आंदोलनात उतरल्याने आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की तुमच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. जालन्याला ज्या अमानुषपद्धतीने महिला आणि मुलांवर लाठीमार केला. कोयता गँग, ड्रग्स माफिया, लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार असंदेनशील आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे.
सत्ताधारी आमदारांचा ट्रिपल इंजिन सरकारवर विश्वास नाही
“सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही”, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सर्व आमदारांना बोलायचा अधिकार
“सर्व पक्षीय बैठक बोलावून अधिवेशन बोलवा असं मी सातत्याने म्हणतेय. चार-पाच दिवसांचं अधिवेशन बोलवा. राज्यातील २८८ आमदारांना बोलायचा अधिकार आहे. पण प्रत्येक आमदाराने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. लोकप्रतिनिधी कोण असतो, सर्वसामान्य लोकांचा आवाज मांडण्यासाठी येथे येत असतो”, असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना दगा दिला
“देवेंद्र आमच्या घराबाहेर येऊन म्हणाले होते की, सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ. जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी १० दिवस वाढवून दिले. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायला ४० दिवस सरकारला दिले होते. ४० दिवसांची ही मॅजिक फिगर त्यांनी (सरकारने) आणली कुठून? त्यामुळे फडणवीस सातत्याने फसवणूक करत आहेत”, अशीही टीका सुळेंनी केली. तसंच, देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच दगाफटका दिला आहे. मनोज जरांगे पटालांना दिला, राज्यातील महिलांना दिला, मराठा समाज, धनगर, मुस्लिम समाजालाही दगा दिला, असंही त्या म्हणाल्या.
फडणवीसांपासून सावध राहा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर पाठवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार आहेत हे त्यांना माहितेय. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला, आता घटकपक्षातील एकनाथ शिंदेंना दगा देत आहेत. त्यामुळे, अजित पवार गटाला माझी विनंती आहे, कधीतरी एका ताटात आपण जेवलोय म्हणून सांगतेय, भारतीय जुमला पार्टीपासून सावध राहा, त्यांनी एकनाथ शिंदेंना धोका दिला”, अशीही टीका सुळेंनी आज केली.