Sanjay Raut on Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. मात्र, धस मुंडे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झाला. यावरून आता संजय राऊतांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संंजय राऊत म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करत आहेत, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील, असं वाटलं होतं. मला तेव्हा लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसतंय.”

“मला वाईट वाटतंय. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. लहान मुले धसांच्या मागे न्यायासाठी धावत होते. जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल तर राज्याची जनता लक्षात ठेवेल. हे पाप आहे, त्याला क्षमा नाही. धसांनी असं केलं असेल तर विश्वासाघातापेक्षाही पुढचं पाऊल आहे”, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

बीडचे लोक वारंवार सांगत होते…

“बीडचे लोक वारंवार सांगत होते की सुरेश धस, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. नाण्याला दोन बाजू असतात. पण इथे तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही. तरी मला अपेक्षा आहे की धसांकडून असं कृत्य होणार नाही”, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे म्हणाले आहेत. “मी स्वत: दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?,” असे सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.