Suresh Dhas बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट आज सुरेश धस यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी आका आणि आकाच्या आकावर आरोप केले आहेत. बीडमध्ये अग्निशस्त्राचे परवाने हे भाजीपाला वाटावा तसे दिले जात आहेत असाही आरोप सुरेश धस यांनी केला. अशा लोकांवर तातडीने कारवाई झाले पाहिजे अशी मागणी मी केली. १०५ परवाने रद्द करण्यात आले आहेत. १ हजार ५० परवाने यांचा आढावा घेऊन त्यातले अनावश्यक रद्द करु असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
बंदुकांचे परवाने कुणाच्या कार्यकाळात वाटले गेले?
सुरेश धस म्हणाले, कुठल्या पोलीस अधीक्षकांच्या कालावधीत बंदुकांचे परवाने गेले आहेत अशा अधिकाऱ्याचं नाव समजलं पाहिजे. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस निरीक्षक असे परवाने देत असतील तर महाराष्ट्राचा बिहार होतो आहेच. कुणीही परवाने काढत आहे, लग्नात बंदुका दाखवत आहेत. चौकात उभा राहिला की ठाँय करतोय. हे ठाँय ठाँय संपवलं पाहिजे अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. हे १५ दिवसांत थांबलं पाहिजे ही विनंतीही मी केली आहे असं सुरेश धस म्हणाले. मी माझ्या आयुष्यात पिस्तुलाच्या कुठल्याही शिफारसी केलेल्या नाहीत. एका डॉक्टरांच्या वडिलांना बंदुक मिळवून दिलं होतं आणि आणखी एकाला दिलं होतं. मात्र त्यांना जंगली श्वापदांचा धोका होता त्यामुळे मी ते मिळवून दिलं होतं. उगाच कुणालाही देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही असंही सुरेश धस यांनी सांगितलं.
आका आणि त्यांचे आका यांच्यामुळेच बीडमध्ये जंगलराज
आका आणि आकाचे आका यांच्यामुळेच सगळं झालं आहे. मी सभागृहातही सांगितलं आहे की मुंबईतही बंदुकांचे परवाने दिलेले नाहीत. राखेचे धंदे करायला यांना पिस्तुलं पाहिजे का? पिस्तुलांचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी मिटवलं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंटची ऑर्डर आहे ती कारवाई वेगाने झाली पाहिजे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं पाहिजे. कारण आकांचं कार्यक्षेत्र वाढलं आहे.
प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच सुरेश धस काय म्हणाले?
प्राजक्ता माळीचा विषय संपला आहे. माझी विनंती आहे की कृपया याबाबत प्रश्न विचारु नका. जे काही होईल त्याला मी सामोरा जायला तयार आहे. माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. कृपया संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडचं जंगलराज, अतिभयंकर खून याचा फोकस दुसरीकडे डायव्हर्ट करु नका. बीड जिल्ह्यातली दादागिरी यावर बोला मी संध्याकाळी पाच पर्यंत उत्तर द्यायला तयार आहे. असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. दुवा काही फार दिवस चालणार नाही. आका आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंद्व चाललं आहे असं दिसतं आहे. मी संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण वगैरे दिलेलं नाही, देणारही नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.