बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हत्येच्या आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अत्यंत निर्घृण पद्धतीने ठार करण्यात आलं. या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे. तसंच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सोमवारी पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडचं नाव ३०२ च्या गुन्ह्यात नक्की येणार असा दावा केला आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
अवादा नावाच्या कंपनीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिक कराडला आज तरी ३०२ मध्ये अटक करण्यात आलेली नाही. खंडणीच्या प्रकरणात एक किंवा दोन दिवसांच्या वर पोलीस कोठडी दिली जात नाही. मात्र न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला सुनावली आहे याचा अर्थ आका (वाल्मिक कराड) लवकर अटक होत नव्हता.
हे पण वाचा- Bhim Army : “संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर वाल्मिक कराडसह आरोपींचा एन्काऊंटर….”, कुणी केली मागणी?
आका आणि आकाचे आका यांचं द्वंद्व सुरु असेल की कुणी शरण जायचं?
आका आणि आकाचे आका यांच्यात द्वंद्व सुरु असेल की शरण कुणी जायचं. सद्यस्थितीत तरी ३०२ च्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांतले सीडीआर तपासल्यानंतर जे काही प्रकरण घडलं आहे ते आकाने ऑर्डर सोडल्यावरच घडलं आहे असं सुरेश धस म्हणाले आहेत. वाल्मिक कराडांच्या बाबतीत दोन महिन्यांपासूनचं रेकॉर्ड तपासलं जाईल.
वाल्मिक कराडच्या विरोधात ३०२ चा गुन्हा दाखल होणार
दोन महिन्यापूर्वी अवादा कंपनीच्या कोणत्या व्यक्तीला तिथे नेलं होतं, पहिल्यांदा ५० लाख रुपये त्यांना दिले होते. विष्णू चाटे, त्यांचे सहकारी सुदर्शन घुले घेऊन गेले होते का? ते परत आले होते का? हे कुणाच्या सांगण्यावर पाठवले? या सगळ्याची साखळी जर नीट तपासली तर माझं मत आहे की, वाल्मिक कराड शंभर टक्के खंडणीच्या गुन्ह्यात आता जरी आरोपी असले, तर पुढच्या रिमांडमध्ये त्यांचं नाव ३०२ च्या गुन्ह्यात म्हणजेच हत्येच्या गुन्ह्यात येईल” असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात हा दावा केला आहे.
वाल्मिक कराडला अटकच होणार होती पण..
पोलिसांनी काही पथकं तयार केली होती. बीडचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी याबाबत गुप्तता बाळगली होती. वाल्मिक कराडसाठी घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत पोलीस पोहचले होते. पोलीस अटक करणार इतक्यात वाल्मिक कराडने शरण येण्याची तयारी दर्शवली. इतर तीन लोक सापडत नाहीत कारण त्यांच्याकडे असलेली गाडी आणि मोबाइल सोडून ते पळाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना वेळ लागतो आहे. आरोपीने मोबाइल बंद केला तरीही त्याचं लोकेशन कळत नाही पण आरोपींना अटक केली जाईल. पोलीस असोत किंवा गृह खातं असो त्यांच्या विरोधात बोलणं सोपं आहे. कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षनेत्यांचा राजीनामा मागितला जातो. आत्ता धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो आहे कारण वाल्मिक कराड हा त्यांचा खास माणूस आहे. असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.