Suresh Dhas : बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. दरम्यान सुरेश धस यांनी याप्रकरणी छोटा आका, आका आणि मोठा आका असे तीन उल्लेख केले आहेत. सुरेश धस यांनी एक महत्त्वाची मागणीही केली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
“मी कुणाला काही घाबरलो नाही. मला भीती वगैरे वाटत नाही. कुठल्याही आकालाही मी घाबरत नाही. आकापर्यंत मी पोहचलो आहे. आका कोण ते सगळ्यांना माहीत आहेच. माझ्या तोंडून मी माझं नाव कशाला घेऊ? मोठ्या आकाचं नाव समोर आलं तर मी घेईन. आधी परळीपर्यंतच गोष्टी घडत होत्या आता त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र वाढवलं. जुलै २०२३ मध्ये जेव्हा इथले नेते सत्तेत आले तेव्हा त्यांनी त्यांचं मंत्रिपद भाड्याने दिलं. काम कसं चाललं आहे ते पाहिलंच नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कळस झाला आहे. शिशुपालाप्रमाणे या लोकांचे ९९ अपराध भरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला लवकर अटक करावी. कारण लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आहे त्यामुळे लवकरच कारवाई केली जावी आणि आकाला अटक करावी अशी आमची मागणी आहे” असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांची मुलगी भावूक; म्हणाली, “माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, मी…”
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहू नये ही लोकांना वाटतंय-धस
“धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहू नये ही लोकांची मागणी आहे. याबाबतचा निर्णय अजित पवारांनी केला पाहिजे. अजित पवारच पुढचे नेते आहेत असं वाटूनच लोकांनी अजित पवारांना ४१ जागा निवडणून दिल्या. मात्र आता अजित पवार या प्रकरणात चुकले तर त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील. आम्ही छोटे लोक आहोत. आम्ही काही अजित पवारांना सांगणार नाही त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा असंही धस यांनी म्हटलं आहे.
पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही-धस
पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असं मला काही वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की मी या प्रकरणात कुणाला सोडणार नाही. मात्र एक बाब आहे की बीड पोलिसांमधले काही लोक आहेत जे यांची मदत करत आहेत. असंही धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी या मागण्या केल्या. नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झाली आहे. आता ते कारवाई करतील अशी आशा आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.