Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणी आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी आज (गुरुवार) मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीडमधील तुरुंगात न ठेवता संभाजीनगर किंवा नाशिकच्या तुरूंगात हालवले जावे अशी मागणी देखील यावेळी केली आहे.
सरकारी वकिल देशपांडे यांनी वाल्मिक कराड प्रकरणात लढण्यास नकार दिला आहे, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी होत आहे. याबद्दल बोलताना धस म्हणाले की, “ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास नकार दिला आहे त्यांचे सरकारी अभिवक्तापद काढून घ्यावं असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे”.
वाल्मिक कराड शरण आला ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यात?
अजित पवार मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीतून वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोणवणे यांनी केला आहे. याबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले की, हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते. म्हणून अजित दादांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलिस स्टेशनला गेली होती”.
आरोपींना बीडच्या तुरुंगात ठेवू नका – धस
संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यातील न्यायालयात चालवू नये ते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टात चालवलं जावं अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. याबद्दल विचारले असता धस म्हणाले की, “माझं असं मत नाही. बीडमध्ये प्रकरण चालवावं. पण हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. हे एकतर संभाजीनगरच्या हरसूल येथे हलवावेत किंवा नाशिकच्या तुरुंगात हलवावेत.”
हेही वाचा>> “मी राजीनामा का द्यावा? याचं काहीतरी कारण…”, विरोधकांच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंचा सव…
पुढे बोलताना धस यांनी यामागचं कारण देखील सांगितलं, ते म्हणाले की, “कारण या आरोपींना भेटायला सुविधा द्यायला… बिंदु नामावलीची बीड जिल्ह्यात वास्तुशांती झाली आहे. बिंदु नामावलीमध्ये एसटी, एससीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आले आहेत. ओपन, मायक्रो ओबीसी, एससीबीसी अशा सगळ्याच जागेवर तेच लोक आले आहेत. एकाच प्रवर्गाचे लोक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जास्त संख्येने झाल्याने बीड जिल्ह्यात कुठल्याही बाबतीत अडचण होऊ शकते. मी आता फक्त त्यांना हलवा म्हणतोय, भविष्यात केसदेखील दुसर्या जिल्ह्यात हलवण्याची पाळी येईल”, असेही सुरेश धस म्हणाले.