Suresh Dhas on Walmik Karad Viral Video : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कथित आरोपी वाल्मिक कराड आणि इतर हल्लेखोरांचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील, प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. यावरून आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं असताना सुरेश धसांचीही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
सुरेश धस म्हणाले, “मी जे आरोप केले होते, त्याचे पुरावे एसआयटीने समोर आणले आहेत. माझे आरोप हवेतील नव्हते. या लोकांचा खंडणी, हत्येशी अकाचा संबंध आहे, यातून हे सिद्ध होतंय. अवादा कंपनींच्या शिंदेंना २९ नोव्हेंबरला गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. तिथून मारत मारत येथे आणलं, त्यानंतर त्याला सोडून दिलं. त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे १०१ टक्के आका, विष्णू चाटे, सुरेश आंधळे हे आरोपी आहेत.”
बीडमधील व्हायरल व्हिडीओ, वाल्मिक कराड, विष्णू चाटे सगळे एकाच फुटेजमधे.@CMOMaharashtra #BeedCrime #WalmikKarad #vishnuchate #बीड #SantoshDeshmukh pic.twitter.com/CEZu4M9dgR
— Sameer C. Jawale (@sameerjawale) January 21, 2025
ते पुढे म्हणाले, “जे गुन्हा करतात ते तो मी नव्हेच असं म्हणतात. पण आता हा मी आहेच हे दिसतंय. मी जे म्हणालो होतो त्याला पुष्टी मिळाली आहे. हे आरोपी खरे आहेत. अजूनही बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळं सापडली आहेत. अजून आंगतुक मुळं आहेत. आंगतुक मुळं अजून राहिली आहेत, त्यांचाही बंदोबस्त व्हावा अशी आमची मागणणी आहे. त्यांची रितसर नावं एसआयटीला देऊ”, असं सुरेश धस म्हणाले.
व्हायरल फुटेजमध्ये काय?
व्हायरल सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.