How Khokya Bhosale Arrested : भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. यासंदर्भातल माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पोलीस काय म्हणाले?
खोक्याच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, ” गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचं शेवटचं लोकेशन सापडलं. त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुसऱ्या राज्यात अटक केल्याने ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागते. त्याकरता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथे आणण्यात येणार आहे.”
सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
“खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केलीय, त्यासंदर्भात त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते विधानभवनात माध्यमांशी बोलत होते.
पोलीस खोक्या भोसलेच्या मागावर का होते?
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी वाल्मीक कराड, त्याचे साथीदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध रान उठविणारे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याने लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.
त्यानंतर खोक्या भोसलेचा दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला. यामध्ये तो पैशांचं बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात-गळ्यात सोन्याचे दागिने घालून मिरवणे असे दृश्य दिसत होते. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले. त्यामुळे खोक्या भोसलेवर आतापर्यंत वन विभागात आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
खोक्या भोसले प्रयागराजला पोहोचला कधी? – अंजली दमानिया
“हा प्रयागराजला पोहोचला कधी? कारण परवा रात्री याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. मग प्रयागराजला पोहोचून बीडच्या पोलिसांना माहिती मिळाली आणि मग त्यांनी अटक केली. बीडच्या पोलिसांना आतापर्यंत कधी कारवाई करताना पाहिलं नव्हतं. पहिली मोठी कारवाई बीडच्या पोलिसांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. यापुढे त्याची संपूर्ण चौकशी करावी. त्याच्या एका लॉकरमध्ये प्रचंड प्रमाणात सोनं असल्याचीही माहिती आहे”, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.