Suresh Dhas : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या मस्साजोग या गावात जाऊन मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांची भेट घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्याने सुरेश धस करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये आले.
नेमकं सुरेश धस आज काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे मोकाट का? असा सवाल आज सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळते आहे असाही आरोप सुरेश धस यांनी केला आहे. वाशी पोलीस ठाण्याचा रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, दत्ता बिक्कड यांनाही सहआरोपी केलं पाहिजे अशी मस्साजोगकरांची मागणी आहे. डॉ. संभाजी वायवासे यांना आणि त्यांच्या पत्नीला सह आरोपी करावं अशी मागणी मस्साजोगमधल्या गावकऱ्यांची आहे. मी या सगळ्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार-धस
वायवासे यांच्याबाबतचं पत्र मी पोलिसांना दिलं आहे. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणीही करण्यात आली आहे. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्यात यावं ही मागणीही करण्यात आली आहे. मस्साजोग करांनी एकूण आठ मागण्या केल्या आहेत असंही सुरेश धस म्हणाले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचं पार्थिव बोरगाव शिवार येथून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केज या ठिकाणी आणणं अपेक्षित होतं मात्र ते पार्थिव पीएसआय राजेश पाटील यांनी कळंबच्या दिशेने वळवलं. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी सुरेश धस यांनी केली आहे. राजेश पाटील हा देखील आरोपी आहे त्याला तुरुंगात टाकणं आवश्यक आहे असंही धस यावेळी म्हणाले.
नऊ आरोपींविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल-धस
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं मत आहे की नितिन बिक्कड याने धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली आहे. तांबोळी आणि शुक्ला यांनाही घेऊन बैठक केली आहे. वाशीहून आरोपी फरार करण्यातही नितीन बिक्कडचा वाटा मोठा आहे. या प्रकरणातला दहावा आरोपी ३०२ च्या प्रकरणात नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
आरोपी तारखेला न्यायालयात आल्यानंतर मोठे बूट घातलेले, विचित्र लोक कसे येतात?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होता नाही, कृष्णा आंधळे फरार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनचा इशारा दिला आहे. याचदरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी रोखठोक भूमिका मांडली. आरोपी तारखेला आल्यावर मोठे बूट घातलेले, चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. आरोपींचं मनोबल वाढवण्यासाठी ते येतात. म्हणूनच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण आवश्यक आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.