Suresh Dhas : बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे आणि क्रूरपणे करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला होता. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या झाली. मागच्या अधिवेशनात त्यांनी सगळं क्रौर्य सांगितलं होतं. आता संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोनंतर सुरेश धस यांनी एक पोस्ट केली आहे.
काय आहे सुरेश धस यांची पोस्ट?
स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.
संतोष देशमुख यांची हत्या हे विकृतीचं लक्षण-सुरेश धस
संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही हैवानियत जिवंत राहिली तर कोणीही सुरक्षीत राहणार नाही. त्यासाठी आत्तापर्यंत मी ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत तो पर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही. आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.
मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील-सुरेश धस
मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील आणि त्यांना घरी पाठवतील याबाबत मला विश्वास वाटतो. जे फोटो समोर आले आहेत ते सगळं कृत्य जल्लादालाही लाजवेल असं आहे. मी आजवर ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. इतक्या भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी कुणालाच सोडणार नाही त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाच सोडलेलं नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी
अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची झोड उठवली आहे. सध्या गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. अशातच, देखमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो पुढे आले असून वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगेनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट
मनोज जरांगे पाटील यांनी आज (४ मार्च) देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, एकच फोटो बघून मी डोळे झाकले, मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही. मी तुटून गेलोय, काय करावं काही समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपींना कसं वाचवलं जाईल याचं नियोजन केलं जातंय. पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.