Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी आष्टी दौऱ्यावर होते. आष्टी दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथाची उपमा दिली. सुरेश धस एकदा मागे लागले की पार डोकं खाऊन टाकतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. तर पंकजा मुंडेंनी स्वतःला शिवगामी म्हटलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेश धस काय म्हणाले?

सुरेश धसांच्या आष्टीमध्ये ब्लॉकबस्टर बाहुबलीचा खेळ रंगला होता..या खेळाला बीड जिल्ह्यातील एकापेक्षा एक दिग्गज जमले होते..निमित्त होतं दुष्काळी भागात कुंटेफळ साठवण तलावाच्या भूमी पूजनाचं. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आष्टीत येत होते. जिल्ह्यातील सगळे आमदार, आणि खासदार एकाच मंचावर होते,धस विरुद्ध मुंडे वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे येणार का हा प्रश्न होताच, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना हजर राहता आलं नाही.. मात्र पंकजा मुंडे आवर्जुन हजर होत्या. या कार्यक्रमला धस अण्णांनी आपल्या शैलीत बॉलिवूड टच दिला.. दिवार पासून ते बाहुबलीपर्यंत सगळ्या सिनेमांचे दाखले अण्णांनी दिले. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र बाहुबली असं म्हटलं होतं. पंकजा मुंडे जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी सुरेश धस यांच्या भाषणाचा उल्लेख करत ते मला शिवगामी देवी म्हणत होते असं म्हटलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

सुरेश धस यांनी भाषणात बोलताना ज्या प्रमाणे सिनेमातले डायलॉग म्हटले त्याच प्रमाणे आज आम्हीही सिनेमातले डायलॉग बोलू आणि शिवगामीच वाक्य असतं ‘मेरा वचन ही है मेरा शासन’ आणि जे वचन मी आमदार सुरेश धस यांना दिलंय तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक असून जे बोलते तेच करत असल्याचे म्हणत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या आष्टीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. हल्ली माझा उल्लेख सुरेश अण्णा पंकजाताई असा करत नाहीत. पूर्वी ते मला शिवगामी म्हणायचे. बाहुबली सिनेमात शिवगामी बाहुबलीची आई आहे असं दाखवलं गेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत माझ्या मनात ममत्व भाव निर्माण झाला आहे असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh dhas said devendra bahubali to cm pankaja munde reacts and said i am shivgami devi scj