Suresh Dhas : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. दरम्यान बीडचे आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं म्हटलं आहे. तसंच बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे असंही म्हटलं आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी आता मिळेल. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची सही झाली. आयजींच्या दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. याची न्यायालयीन चौकशी होईल” असं बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे” असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर
“बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू आहे, मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेता आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकासारखा छोटा आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता १०० टक्के खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही. ३०२ चे मुख्य सूत्रधार यामागे आहेत” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
मी आकाला घाबरत नाही-सुरेश धस
“बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं असंही धस खोचकपणे म्हणाले. “आकाला मी घाबरत नाही. ९ तारखेला घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका ३०२ मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे. पीडित लोक माझ्याकडे येणार आहेत” असं सुरेश धस यांनी सांगितलं.