Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. तसंच या प्रकरणात वाल्मिक हे नावही चर्चेत आलं आहे. सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा विषय लावून धरला आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी असा एक उल्लेख केला होता. ज्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी बडी मुन्नी कोण? हे सुरेश धस यांनाच विचारा. असं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी मुन्नी कोण हे मुन्नीला कळलं आहे आणि मुन्नी म्हणजे पुरुष आहे असं म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी नेमका काय उल्लेख केला होता?
सुरेश धस यांनी असा उल्लेख केला होता की, राष्ट्रवादीत मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धसांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता सुरेश धस यांच्या या मुन्नीच्या विधानावर अजित पवार हे चांगलेच संतापले.
बडी मुन्नी कोण? हे विचारताच अजित पवार संतापले
सुरेश धस यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला, बडी मुन्नी कोण? असं विचारताच अजित पवार म्हणाले, “बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. कुणी फाल्तू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणारा आहे. त्यामुळे त्याला (सुरेश धस) विचारा तो कुणाबद्दल बोलतो आहे.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
आज सुरेश धस मुन्नीबाबत नेमकं काय म्हणाले?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध दुरान्वये आहे की कसा संबंध आहे ते अजित पवारांना लवकरच कळेल” असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तसंच मुन्नी कोण हे सांगा म्हटल्यावर सुरेश धस म्हणाले, “जी कुणी राष्ट्रवादीतली मुन्नी आहे तिला कळलं आहे. एकच आहे ती महिला भगिनी नाही, पुरुष मुन्नी आहे, पुरुष मुन्नीला माहीत आहे की सुरेश धस माझ्याविषयी बोलत आहेत. त्यामुळे मी म्हटलं की मुन्नीने चर्चेला यावं. कुठेही मुन्नीने येऊन बसावं आम्ही चर्चेला येतो. मुन्नीने सांगावं सुरेश धस मला मुन्नी म्हणतो आहे. मी लगेच चर्चेला येतो.
१०५ बेवारस प्रेतं सापडली आहेत, जी जाळण्यात आली-धस
१०९ बेवारस प्रेतं सापडली आहेत त्यातल्या ४ प्रेतांची ओळख पटली आहे. बाकी १०५ प्रेतं बेवारस म्हणून जाळण्यात आली आहेत. ती नगर परिषद धनंजय मुंडेंच्याच ताब्यात आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.