Suresh Dhas : बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ९ डिसेंबर २०२४ या दिवशी घडली होती. या हत्या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच सूत्रधार असलेला वाल्मिक कराडही तुरुंगात आहे. वाल्मिक कराडबाबत सुरेश धस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा एकदम निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो मागच्या सोमवारी व्हायरल झाले. या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पण या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच होता ही बाब तपासात समोर आली. दरम्यान मागच्या मंगळवारी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी आता वाल्मिक कराडबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. वाल्मिक कराड घरगडी होता आणि त्याला मालक करण्यात आलं असं आता सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

“वाल्मिक कराड आधी फक्त घरगडी होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाई करायचा. पुढे मुंडे साहेबांच्या आणि टीपी मुंडेंच्या महाविद्यालयाच्या राजकारणात गोळीबार झाला. त्यातली एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. नशिबाने तो वाचला. त्याच्यानंतर वाल्मिक कराड थेट गोपीनाथरावांच्या घरातच गेला. आमच्यासाठी गोळी खाल्ली म्हणून वाल्मिकचे कौतुक झालं. तो साहेबांच्या जवळ गेला. गोपीनाथराव आणि पंडित अण्णा एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. हे दोघे वेगळे झाल्यानंतर वाल्मिक पंडितांनांकडे वळला”

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघांनीही ग्रिडी पॉलिटिक्स केलं-धस

गोपीनाथराव आणि पंडित अण्णा मुंडे हे तसे कधी वेगळे नव्हते. भावा भावांचं प्रचंड एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. त्यांचं विभाजन झालं त्यावेळी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला. जो सुरुवातीला घरगडी होता. त्यालाच तुम्ही मालक करून टाकलंत. एवढा मोठा मालक केला की सगळंच त्याच्यावर सोपवलं .जर एखाद्याची लायकी १०० रुपयांची असेल आणि त्याला दहा लाख रुपये दिल्यावर तो काय करणार? खाणार आणि दहा लाखांचे एक कोटी करण्याचा प्रयत्न करणार. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही ग्रिडी पॉलिटिक्स केलं. सुरेश धस यांनी हा दावा केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे.

Story img Loader