कोटय़वधी रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी सुमारे दीड वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने जळगाव महापालिका निवडणुकीत सर्वाधिक (३३) जागांवर विजय मिळवला. सत्तेसाठीचे संख्याबळ मिळवण्यासाठी त्यांना मनसे (१२) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (११) यांच्या मदतीची गरज असली तरी जळगावात अजूनही आपणच ‘दादा’ असल्याचे सुरेश जैन यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भाजपला या निवडणुकीत १५ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत भोपळा लाभला आहे.
सुरेश जैन हे तुरुंगात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत जळगाव महापालिका ताब्यात घेण्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांचे स्वप्न होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आ. जैन यांचे बंधू माजी महापौर रमेश जैन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. मात्र, त्यांना काही जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. सत्तेच्या भोज्याला शिवण्यासाठी सत्ताधारी आघाडीला अजून पाच जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता असून जनक्रांतीच्या दोघांनी आणि एका अपक्षाने त्यांची साथ करण्याचे ठरविले तरी दोन जागांसाठी त्यांना शोधाशोध करावी लागणार आहे. अशा स्थितीत मनसे आणि राष्टवादी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहेत. परंतु सध्यातरी कोणत्याच नेत्याने पाठिंब्याविषयी जाहीर वक्तव्य केलेले नाही.

मलकापूरमध्ये काँग्रेसचा विजय
बहुचर्चित मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने सर्व १७ जागा भरघोस मताधिक्याने जिंकल्या. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. या निकालाने मुख्यमंत्र्यांच्या गटाला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

भद्रावती नगर पालिकेवर भगवा
भद्रावती नगर पालिकेवर सलग चौथ्यांदा जिल्हा प्रमुख बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेने सर्वाधिक १४, भारिप-बमसंने प्रत्येकी ३, बसपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाकपला प्रत्येकी २, तर स्वभाप व अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. तर भाजप, मनसे, युवाशक्तीला खाते सुध्दा उघडता आले नाही.

जळगाव महापालिका
एकूण जागा ७५
खान्देश विकास आघाडी ३३
भाजप १५
मनसे १२
राष्ट्रवादी ११
जनक्रांती ०२
अपक्ष ०२

Story img Loader